Skip to main content

लेकरांनो, तुमच्यासाठीच...

*लेकरांनो, तुमच्यासाठीच......*
          🖋 *ज्ञानदेव नवसरे ,धामणगाव*

@⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩  अर्थात माझे मुख्याध्यापक सर यांचे आज नोकरीची चार -साडेचार वर्ष बाकी आहेत पण कामाची ऊर्जा ,तळमळ आजही चार वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकासारखी. कामाची धडपड तरुण शिक्षकांनाही लाजवेल अशीच.
         काल शनिवारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघं शाळेसाठी  लेझीम, टिप-या,ट्राॅफ्या, बँकेचे काम , माईक स्टॅण्ड, ड्रम स्टॅण्ड ,शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यातून नाशिक ला बाईकवर गेलो होतो. सर्व साहित्य एकाठिकाणी मिळणार नव्हतं त्यामुळे  नाशिकमध्ये गेल्यानंतर एका जागेवरून दुस-या जागेवर जाण्यासाठी आम्हाला बाईकची गरज पडणार होती म्हणून बाईकवरच जाणे गरजेचे होते. गाडीमुळे  आमचा वेळ वाचणार होता अन कामे पटकन होणार होती पण साहित्य बरंच असल्याने अडचणीत वाढही होणार होती. त्यातच शनिवारी शाळा सुटल्यानंतर जेवण करुन घरची कामं आवरुन निघायला येवल्यातच १२ वाजून गेले.  निघता करता १२:३० झाले .
येवल्यात सुरु झालेली गाडी शेवटी २:३०  वाजता नाशिकमध्ये पोहचली.

@⁨राजेंद्र चव्हाण HM धामणगाव⁩   यांचे मणक्याचे Operation झालेले आहे . डाॅक्टरांनी सरांना गाडीचा जास्तीचा प्रवास टाळायला लावलेला आहे ,गाडीच्या प्रवासाने त्रास होतो तरीही शाळेसाठी सरांना नाशिक ते येवला हा लांबचा प्रवास गाडीवर करावा लागणार होता.

      नाशिकमध्ये शाळेचे  साहित्य घेण्यासाठी अनेक दुकानं दोघं फिरत होतो. सतत गाडीवर उठबस होत होती. माझ्या गाडीची मागच्या सीटला  उंची काहीसी जास्त असल्याने सरांना बसायला-उतरायला त्रास व्हायचा. मला जाणवत होते की चव्हाण सरांना त्रास होतोय पण सरांनी एत्किंचितही माहिती होऊ दिले नाही.हे सगळं सहन करताना त्यांना आनंद वाटायचा कारण त्यांच्या मनात लेझीम खेळणारी ,टिप-या वाजणारी लेकरं ,माईक स्टॅण्डवर ठेवून दिमाखात परिपाठ घेणारी अन भाषणं करणारी लेकरं , ड्रम स्टॅण्डवर ठेवून दिमाखात वाजवणारे विद्यार्थी नाचत होते. या सर्वांसाठी त्रास झेलत होते. माझ्या मनात  विचार यायचा आज सरांचे काही वर्षच नोकरीची बाकी आहेत पण शाळेसाठी तळमळ अन ऊर्जा अजूनही किती!  चव्हाण सरांकडून मिळणारी हीच प्रेरणा आम्हा सर्व शिक्षकांना अधिकचे काम करण्याचे बळ देते.

     शाळेचे सर्व  साहित्य खरेदी करतानाचे बारकावे, काळजी , उत्कृष्ट दर्जाचेच साहित्य खरेदी करायला हवं ही भावना शाळेप्रतीच्या आपुलकीची ,जबाबदारीची ,काळजीवाहूची  साक्ष देत होती. माझ्या शाळेतील लेकरांना कमीत कमी किमतीत चांगल्या दर्जाचे साहित्य उपलब्ध व्हावे यासाठीची सरांची धडपड प्रत्येक क्षणाला मनाला स्पर्श करत होती.

       साहित्य घेतल्यानंतर पाठीमागे बसून सगळं सांभाळताना सरांची तारेवरची कसरत होत होती. एका दुकानातून दुस-या दुकानात जाताना एखाद्याला बोलावून साहित्य गाडीवर ठेवावे लागायचे अन उतरवताना पुन्हा दुसरा माणूस ....

        मला गाडी चालवावी लागत असल्याने पाठीमागे बसून सरांना साहित्य सांभाळावे लागत होते. लेझीम अन टिप-यांचे ओझे तर सरांना मांडीवर घ्यावे लागायचे.  बाईक थोडी जरी जोरात केली अन एखाद्या लहानशा खड्यात आदळली तरी सरांच्या पायाला जोरदार कळा येत होत्या. चव्हाण सरांना खुप त्रास होतेय हे मला समजत होते पण सरांनी तरीही बोलून दाखवलेच नाही.  मुलांसाठी हा त्रास सहन करत होते. सगळे साहित्य घेतानाचे अन वागवण्याचे  ससेहोलपट मार्गी लावताना नाशिकवरुन परतीसाठी सायंकाळचे  ७:०० वाजले. प्रवास लांबचा अन अंधाराचा साहजिकच काळजी वाटत होती. रात्रीच्या अंधाराची चाहूल जशी लागली तशी गाडीवर बसल्यावर नाशिकच्या गारट्याची लगबगही जाणवली. नाशिकचा गारठा अंगावर धावून येऊ लागला . मला तर काळजी वाटू लागली अजून तर निफाडचा भयान गारठा सहन करायचा होता.

         माऊली ,सायंकाळी आपल्याला उशीर होऊ शकतो थंडीचे कपडे सोबत असू द्या असे चव्हाण सरांनी प्रवासाला सुरुवात करण्याअगोदरच सांगितले होते त्यामुळे  काळजीने कपडे घेतलेले होतेच.

          नाशिकवरुन काही किलोमीटर पुढं आल्यानंतर एका दुकानाजवळ मी गाडी थांबवली . चव्हाण सरांनी विचारले ,"माऊली का थांबवली  गाडी?"
"थांबा आपण बांधता येणारे साहित्य बांधून घेऊ म्हणजे तुम्हाला बसायला अडचण होणार नाही" ,मी म्हणालो.
        दुकानातून सुतळी खरेदी केली जे साहित्य सरांना मांडीवर घ्यावे लागत होते अन घेताना अडचण,त्रास होत होता असे ड्रम अन माईक स्टॅण्डला पाठीमागे बांधून घेतले. पुन्हा सरांना साहित्य घेऊन बसायला अडचण आली नाही.
          चव्हाण सर म्हणाले,  " माऊली आता मला काहीच अडचण येत नाही, पाय मोकळा झालाय ,खुप छान वाटतंय". सरांच्या या वाक्याने मला खुप बरं वाटलं .आता मी बिनधास्तपणे गाडी चालवू शकत होतो.
         निफाडच्या जवळ आल्यानंतर हवेच्या झुळक्याने अन  गाडीच्या वेगाने अंगाला लागणारा गारठ्याने अंगावरच्या थंडीचे कपड्यांनी अंग टाकून दिले. आता हेलमेटच्या खाली दबलेले तोंड वू sss वू sss करु लागले अन दातांनी एकमेकांवर आदळायला सुरुवात केली.माझ्या पाठीमागे असणाऱ्या चव्हाण सरांना साहित्य अन गारठा ह्या दोघांनाही सामोरे जावे लागत होते. खरंतरं जरा जास्तच थंडी वाजायला लागली होती.
निफाडच्या काहीसं पुढं दिवसभर पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना शांत करण्यासाठी जेवण केलं. अंधार जसा वाढत होता तशी थंडी वाढत होती अन घरच्यांची काळजीही वाढणार होती त्यामुळे गरबडीनं चार घास पोटात ढकलून पुढं निघालो. जेवण केल्यानंतर थंडीचा जोर काहीसा  आणखी वाढला. एक गाडी पाठीमागून जोरात येत होती त्यामुळे सावकाश चालणा-या अन बहुधा खुप दुरून आलेल्या (गाडीमागे खुप गरम लागत होते) मालगाडीच्या पाठीमागे बाईक घ्यावी लागली.  मालगाडीच्या पाठीमागे गरम हवा लागू लागली. थंडी कमी झाली कारण मालगाडीच्या आडून थंड हवा आम्हाला लागत नव्हती. तापलेल्या मालगाडीच्या इंजिनमुळे गरम हवा अंगाला चिटकायला लागली. काहीसं बरं वाटू लागलं. मालगाडीत खुप लोड होता त्यामुळे ती जेमतेम ३०-५० च्या स्पीड ने चालत होती. थंडी वाजू द्यायची नाही तर मग ह्या गाडीच्या पाठीमागे आम्हाला जावे  लागणार होते. आम्ही आमच्या गाडीला मालगाडीच्या पाठीमागे घेतलं. तसं बरंच अंतर ठेवूनच होतो आणि  दोन्ही गाड्या सावकाशच होत्या त्यामुळे तसा धोका नव्हताच. मालगाडीच्या पाठीमागे हळूहळू प्रवास करु लागलो. गतिरोधक आले की सरांचा आवाज यायचा, "माऊली हळूच ,पुढे गतिरोधक आहे." सरांना भिती वाटायची की बाईक पुढंच्या मालगाडीला लागेल. डोळ्यात तेल घालून निफाड ते विंचूर प्रवास झाला . विंचूर ला मालगाडीने वळण घेतले. आमची थंडीसोबत झुंज पुन्हा सुरु झाली. थंडीसोबतची झुंज खेळत खेळत शेवटी आम्ही येवल्यात पोहचलो , साहित्य सरांच्या दारात टेकवले अन सुटकेचा निश्वास टाकला.

धन्यवाद 🙏🏻

Comments

Popular posts from this blog

रंगू आत्मविश्वासाच्या रंगी

*रंगू आत्मविश्वाच्या रंगी*                  - ज्ञानदेव नवसरे                        आत्मविश्वास ही विजयाची चावी आहे . आत्मविश्वास असेल तर विजय पायाशी लोळण घेतो हे विद्यार्थी दशेपासून अनुभवत आलो आहोत. एखादी गोष्ट करताना, बोलताना  आत्मविश्वास खुप महत्त्वाचा असतो. आपल्यात एखाद्या गोष्टीतील आत्मविश्वास विकसित होताना  आजूबाजूच्या वातावरणाचा मोठा पगडा असतोय.                    महाराष्ट्रात येवल्याचा पतंगोत्सव प्रसिद्ध आहे.इथे पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गेल्या आठ -पंधरा दिवसांपासून बच्चे कंपनी पतंगोत्सवाची लगबग सुरु होती आणि आज मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. आमच्या शेजारला राहणाऱ्या दिगांबर यादव सरांचा मुलगा दादूची अन शंभूची खुप छान गट्टी आहे. तो शंभुपेक्षा मोठा आहे वय अन अनुभवाने सुद्धा. मुलं घरातील अन बाहेरील अनुकरणातून ब-याच गोष्टी शिकत असतात तसे शंभू देखील दादूकडून अनेक गोष्टी शिकत असतो. पतंग ,रीळ, मांजा...

माझा पाडा ,माझे विद्यार्थी

 *माझा पाडा, माझे लोक, माझे विद्यार्थी*     - ज्ञानदेव नवसरे        पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील सेवा हा आयुष्यभर न विसरता येणारा ठेवा आहे .पेठच्या पश्चिमेस १० किमी अंतरावर गुजरात सरहद्दीवर असणारे डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले टुमदार असा कळमपाडा माझ्या सुरूवातीच्या सात वर्षांच्या नोकरीचा न विसरता येणारा महत्त्वाचा टप्पा होता.            कोराना कालावधीमुळे लांबणीवर पडलेली आमची कळमपाडा शाळेचे भेट आज धामणगाव शाळेच्या टीमसोबत  झाली.           कळमपाडा हे निसर्गाने जितके नटलेलं आहे त्यापेक्षा जास्त या पाड्यामध्ये राहणाऱ्या माझ्यासारख्या पर-जिल्ह्यातून आलेल्या लेकरावरं स्वतःच्या लेकराइतकं, भावाइतकं प्रेम करणाऱ्या माझ्या ह्रदयस्पर्शी लोकांचं हे गाव आहे. माझ्याबद्दल कळमपाड्यातील लोकं काय बोलतात हे कळमपाड्यातील लोकं , माझे विद्यार्थी बोलतील ,याबद्दल मी काय बोलणार ?               काम करणा-या शिक्षकांच्या कामाचा सन्मान कसा करावा हे आमच्या कळमप...

मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत

* मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत ....* 📝 *ज्ञानदेव नवसरे, नाशिक* फोटो सौजन्य : Google              आज पहिलीच्या मुलांना मुक्त चित्र काढण्यासाठी कोरे कागद दिले होते. मी फळ्यावर फुले,बादली, ग्लास, फुलपाखरू यांचे सोप्या पद्धतीने काढलेली चित्रे फळ्यावर रेखाटली होती.      सचिन ने काढलेले चित्र मला दाखवले. मी म्हणालो,"हे काय आहे ?" सचिन, "हे भूताचे , हे माझे आणि हे माझ्या घराचे चित्र आहे". मी म्हटले, छान काढलेय. मुलांनी सचिनचे चित्र पाहायला लगबग केली. सचिनच्या जवळ मुलांचा गलका जमा झाला. त्यांच्यात भुतांच्या गोष्टी वर गप्पा सुरू झाल्या. भूत अमुक असतं ,तमुक असतं आणि ब-याच गोष्टी चालू होत्या.माझ्या इयत्ता चौथीचा इंग्रजी विषय असल्याने मी पेपर तपासत असताना मुलांमधील सुरु असणा-या गप्पांकडे लक्ष जात होतेच.थोडा वेळ थांबून ऎकून घेतले. गावात म्हसोबाचे मंदीर आहे त्या देवस्थानाला जागृत देवस्थान म्हटले जातेय. भूत म्हणले की देव आलाच त्यामुळे म्हसोबावर बोलत होते. म्हसोबावर कडे हातात घातले की भूत काय बी करत नाय. माझी आई म्हसोबाला  दिवा लावते ...