Skip to main content

सहनशक्तीचा डाव

😡😥🤩 *सहनशक्तीचा डाव* 🤩😥😡
                     🖋 *ज्ञानदेव नवसरे*   
        www.Shikshanvichar.blogspot.in

          मुलांना खेळायला आवडते .खेळताना जिंकायला आवडते. मुले खेळात जिंकण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. जीव ओतून खेळतात पण इतके करुनही हार मिळाली की कासावीस होतात.एकमेकांवर राग करायला सुरुवात करतात.
            अध्यक्ष चषकाच्या स्पर्धांच्या तयारीसाठी शाळेत इयत्ता सहावी- सातवी कबड्डीचा सराव आमचे पदवीधर शिक्षक रामेश्वर जाधव सर घेत असायचे. एका शनिवारी त्यांना कामामुळे शाळेवर उपस्थित राहता आले नाही.
          अध्यक्ष चषक स्पर्धा जवळ येतेय, मुलांचा चांगला सराव व्हावा  यासाठी खेळाडूंना मैदानावर घेऊन जावे लागले.मुलांनी त्यांच्या पद्धतीने दोन गटात विभागणी करुन घेतली. एक गट दुस-यापेक्षा जास्तच सरस झाला होता.सातवीचा सचिन जेजुरकर त्यांचे नेतृत्व करत होता. पाच पाच मिनिटाचे दोन सामने झाले पण सचिनच्या गटानेच विजश्री खेचून आणली. माझ्या लक्षात आले की दोन्हीकडं सारख्याच ताकदीचे तुल्यबल खेळाडू असायला हवेत म्हणून थोडा बदल करत सचिनच्या गटातील दोघांची अदलाबदली केली. आता सामन्यात आणखी रंगत येऊ लागली. दोन्हीबाजूंनी सामना जिंकायची रस्सीखेच सुरु झाली. प्रत्येकजण स्वतः चा संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करु लागला. आम्हीच जिंकू असा विश्वास सचिनला वाटायचा कारण तो स्वतः पण चांगला खेळ करतो. यावेळी मात्र सचिनच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा मीच जिंकेल या विश्वासाने नव्याने दुसरा सामना खेळायला सुरुवात झाली पण पुन्हा पराभव झाला.
दोन वेळा पराभव स्वीकारलेल्या सचिनचे लक्ष सोबतच्या खेळांडूवर गेले. त्याने पराभव झाल्यानंतर  इतरांवर चिडायला सुरुवात केली. सहकारी खेळाडूंच्या खेळाचा त्याला राग येऊ लागला. नीट खेळा म्हणून ओरडायला लागला.सहकारी खेळाडूंना भलतंसलतं बोलायला सुरुवात केली. दोन्ही संघ प्रत्येकी दोन डाव जिंकला होता.
           नवीन डाव सुरु करण्याअगोदर सर्वांना जवळ घेतले अन समाजवून सांगितले. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा खेळातही हार अन जीत असतेच. आज दुसरा जिंकला तर उद्या तुम्ही जिंकत असता . खेळावरील लक्ष, सराव, जिंकण्याची जिद्द, समूहकृतीतून तुम्ही जिंकता आणि आनंद साजरा करतात. खेळातील आनंद जसा आवडतो तसा पराभव झाल्यावर समूहभावनेतून त्या सहन करायला सुद्धा आवडायला हवे,  शिकायला हवे. यश मिळाले तर माझ्यामुळे अन पराभव झाला तर सहका-यांकडे पाहण्याची सवय आपल्याला निराशाकडे घेऊन जाते. आपल्या संघाची हार झाली तर आणखी जिद्द,चिकाटी अन एकसंघ खेळून पुन्हा विजश्री आणता येईल कारण हार के आगे जीत है | यातूनच तुमची सहनशक्ती विकसित होणार आहे .
            सहनशक्ती विकसित झाली की भविष्यातील अडचणींना सामोरे जाताना अडचण येत नाही. आपण अडचण सोडविण्यात यशस्वी नाही झालो तर त्यासाठी सहनशक्ती वाढवू शकतो त्यामुळे भविष्यात नैराश्य येत नाही.
            ज्यावेळी मुले हसत हसत हार पचवायला लागतात त्यावेळी त्यांच्यातील खिलाडूवृत्ती अाणखी विकसित होत असते ,ही एक चांगली सवय आहे. स्वतः ची दुबळी सहनशक्ती संपल्यामुळे जगभरातील अनेक लोकं जीवनातील समस्यांना ,दुखांना , अडचणींचा सामोरे जाताना स्वतः ची जीवन यात्रा संपवत आहेत . खरंतर अशा खेळाच्या प्रसंगातून मुलांना भविष्यातील अनेक बाबींबद्दल सजग करता येत असते. विद्यार्थ्यांना अनुभव देताना स्वतःलाही समृद्ध बनवता येते.

धन्यवाद ...

Comments

Popular posts from this blog

लेकरांना मित्रपरिवार वाढवू द्या

*लेकरांना मित्रपरिवार वाढवू द्या* लहान मुलांना खेळणी खेळायला खुप आवडते. शंभूराजला बाजारातून आणलेल्या गाड्यांच्या खेळण्यांची विशेष आवड आहे . आमच्या घरात ढीगभर गाड्या पडलेल्या असतात. तरीही इतर वस्तूंना गाडी समजून खेळण्याची भारी आवड आहे. आमच्या घरात शेजार मित्रमंडळींच्या लेकरांची आणि इतरही आजूबाजूच्या घरातील लेकरांची नेहमीच ये जा असते. शंभुराजच्या खेळण्यांचा सर्वजण आनंद घेत असतात त्यामुळे लेकरं लेकरांच्या जवळ आपसूक येतात. एकमेकांच्या खेळण्यांना शेअर करत असतील तर त्यांच्यातील सामाजिकतेचा बंध उत्तम गतीने विकसित होत आहे असे म्हणता येईल. लहानपणी अनेक बदलातून मूल घडत असते. त्यापैकी एक आपली वस्तू कोणासही न देणे.  अशी मुलं आपल्या वस्तूला कोणासही हात लावू देत नाहीत .  त्याच्या वस्तूला हात लावलेलं अजिबात आवडत नाही.एका दृष्टीने ते बरोबर पण असेल पण अनेकदा मुलांमध्ये ही सवय दिसते की आपल्या वस्तू कोणालाही द्यायला तयार होत नाही. हे खास ज्यावेळी आपली वस्तू नवीन असते त्यावेळी मुले आपली वस्तू द्यायला तयार होत नाहीत. खरंतर लहान मुलांना ही सवय असायला हवी की आपल्याकडे असलेली गोष्ट सहजतेने इतरांन...

मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत

* मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत ....* 📝 *ज्ञानदेव नवसरे, नाशिक* फोटो सौजन्य : Google              आज पहिलीच्या मुलांना मुक्त चित्र काढण्यासाठी कोरे कागद दिले होते. मी फळ्यावर फुले,बादली, ग्लास, फुलपाखरू यांचे सोप्या पद्धतीने काढलेली चित्रे फळ्यावर रेखाटली होती.      सचिन ने काढलेले चित्र मला दाखवले. मी म्हणालो,"हे काय आहे ?" सचिन, "हे भूताचे , हे माझे आणि हे माझ्या घराचे चित्र आहे". मी म्हटले, छान काढलेय. मुलांनी सचिनचे चित्र पाहायला लगबग केली. सचिनच्या जवळ मुलांचा गलका जमा झाला. त्यांच्यात भुतांच्या गोष्टी वर गप्पा सुरू झाल्या. भूत अमुक असतं ,तमुक असतं आणि ब-याच गोष्टी चालू होत्या.माझ्या इयत्ता चौथीचा इंग्रजी विषय असल्याने मी पेपर तपासत असताना मुलांमधील सुरु असणा-या गप्पांकडे लक्ष जात होतेच.थोडा वेळ थांबून ऎकून घेतले. गावात म्हसोबाचे मंदीर आहे त्या देवस्थानाला जागृत देवस्थान म्हटले जातेय. भूत म्हणले की देव आलाच त्यामुळे म्हसोबावर बोलत होते. म्हसोबावर कडे हातात घातले की भूत काय बी करत नाय. माझी आई म्हसोबाला  दिवा लावते ...

मुलांना दिशा देऊयात

* मुलांना दिशा देऊयात *   अाज नेहमीप्रमाणे शंभू खिदळून आला होता पण त्याच्या चेह-यावरील तेज कमालीचे होते. "आप्पा चला ना खेळायला जावू" शंभू लाडात येऊन बोलला. मी शाळेतून दमून आलो होतो.  "नको रे शंभू ,मी खुप दमलोय. " आई सांग ना आप्पाला ." खरतर आमचं दोघांचं खेळणं म्हणजे भारीच असतयं.  शंभूच्या खेळण्यांसोबत रमताना मलाही लहानपणाचा अनुभव घेता येत असतो.कधीकधी माझी बायको मला खुप हसते माझे बाळासोबत असतानाचे संवाद, चेह-यावरील हावभाव पाहून.😁 माझं लहान झालेलं पाहून शंंभू मात्र बिनधास्तपणे माझ्यासोबत खेळतो. ब्लाॅक्स ची भरणी आम्ही खाली घेतली .दोघंही वेगवेगळे आकार बनवायला लागलो. मी गाडीचा आकार बनविला अन शंभूचे काम सुरूच होते. "काय बनवितोय शंभू?" मी म्हणालो.  "मला घर बनवायचेय."  मी घराच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले अन त्यानेही सगळी उत्तरे दिली. "मला लय काही बी बनविता येते." शंभू बोलत होता.  काय काय बनविता येते? बंदूक, गाडी,घर,शाळा ,पाटी ,माणूस.  मी त्याचे कौतुक केले अन त्याला कवेत घेतले .यावरून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मुलांकडे गु...