Skip to main content

निर्णयांची कसरत

😇☺ 🙆🏻  *निर्णयांची कसरत ...* 🙆🏻‍♂😊😇
          🖋 *ज्ञानदेव नवसरे* www.shikshanvichar.blogspot.in

             जया प्रथमच गाव सोडून बाहेर
गावी आमचं गाव , घर आणि घरातील माणसं सोडून इतर गावात (पेठ) पहिल्यांदाच राहत होती. सुरूवातीला मी घरी नसलो की तिच्या मनात असुक्षिततेची भिती वाटत असायची कारण तिच्यासाठी सर्व काही नवीनच होते. आमच्या शेजारला तिची काॅलेजातील मैत्रीण सीमा सोबत होती. सीमाचे मिस्टर शिक्षक असल्याने शेजारला राहत असायचे. जयाच्या ओळखीची मैत्रीण सोबत असल्याने मी बिनधास्तपणे शाळेवर जात असायचो. ती दुपारचे जेवण, बाजार, इतरांच्या ओळखी व्हाव्यात, बाजारहाट   सीमासोबतच करायची.
        पेठचा बाजार मंगळवारी अन गुरूवारी भरतो . पेठला चांगली भाजीमंडई होतीच . दररोज म्हटलं तरी भाजी विकत घेता येत होती पण शेतक-यांकडील चांगली भाजी मिळावी यासाठी ती बाजारदिवशी आठवडाभराचा बाजार करुन आणत असे.
           आईवडीलांना सोडून दोघांनीच राहायचेय अशी पहिलीच वेळ होती. नव-याला खुश करण्यासाठी नव-याच्या आवडीने स्वयंपाक करायचा ,त्यांच्या आवडीनिवडीनुसार भाज्या आणायच्या आणि नवरा म्हणेल तीच भाजी करायची असं तिनं मनात ठरवित होती की काय कुणास ठाऊक ?  तिला वाटायचं की अमुक भाजी केली तर त्यांना आवडेल की नाही ? म्हणून दररोज स्वयंपाक करताना मला अगोदर विचारायची, "आज कोणती भाजी करायची?" ती बाजारातून आणलेल्या सगळ्या भाज्यांची नावांची यादी सांगायची. जसा बाजारदिवस जवळ येईल तशी यादी कमी व्हायची कारण भाज्या संपत आलेल्या असायच्या. सुरुवातीचे काही दिवस तिने विचारले की पटकन कुठल्या तरी एका भाजीचे नाव घेऊन मी मोकळं व्हायचो. मला माहिती असायचं कोणती जरी भाजी बनवायला सांगितलं तरी ज्या बाजारातून आणल्यात त्याच बनवाव्या लागणार आहेत आणि हळूहळू सगळ्या भाज्या संपणारच आहेत. त्यामुळे भाजी सांगायला वेळ लागायचा नाही. 
           जयाला हळूहळू भाजी कोणती बनवायची यासाठी जसं मला नेहमीच विचारायची तसं इतर घरातील इतर  बाबीही मला विचारून करायला तिने सुरुवात केली होती. गावाकडे आई वडिलांसोबत राहतो त्यावेळी असं कधी घडत नसायचं. दोघांना घराबाहेर जायचे असेल तर कोणती साडी घालू ? नाष्ट्याला काय बनवायचे?  घरातील टेबल ,खुर्च्या इथं ठेवायच्या की तिथं ठेवायच्या ? अशाचप्रकारचे अनेक गोष्टी  विचारून करायला तिनं सुरुवात केली होती.
       तिची प्रत्येकवेळी एखादी गोष्ट विचारून करणे आवडत नसायचे कारण तिच्यातील निर्णयक्षमतेचा ती वापर करणे कमी करीत चाललीय हे माझ्या लक्षात येऊ लागले .
            खरंतर मोठ्यांमध्ये काय अन लहान मुलांमध्ये काय निर्णय घेण्याचा अभाव आढळतोच कारण निर्णयक्षमता विकसित झालेली नसते तर ती विकसित करण्याची बाब आहे. निर्णयक्षमता सवयीने आणि जबाबदारी स्वतः वर घेतल्याने विकसित होत असते.ज्यावेळी आपल्यावर लहान लहान जबाबदारी पडते तेव्हा त्यातून निर्णयक्षमता विकसित होते परिणामी मोठमोठे निर्णय घेतानाही अडचण येत नाही.
            जयाचे निर्णय तिने घ्यावेत असे मला सतत वाटायचे परंतु मला विचारून काम करायची  सवय काही जायला तयार नव्हती. शेवटी तिला समजावून सांगितले प्रत्येक वेळी लहान गोष्टींचे निर्णय माझ्यावर सोडून द्यायचे बंद करायला हवं. स्वतः चे निर्णय स्वतः घेत जा त्यासाठी अनेकवेळा तिला सांगावे लागले. तेव्हापासून मला न विचारता तिच्या आवडीचे कपडे घालून बाहेर जाणं असेल, भाजी बनविणे असेल किंवा घरातील इतर गोष्टी स्वतः करु लागली. स्वतः चे लहानसहान निर्णय घेऊ लागली. आयुष्यातील मोठे निर्णय घेताना अनुभवी लोकांची सल्लामसलत करायला हवी याची जाणीव ठेवावी लागते हे तिला ठाऊक होतेच.
          आपण विचार करायला लागतो त्यातून निर्णयक्षमता, नेतृत्वशैली विकसित होत असते हे आपल्याला मनात ठेवायला हवंय.
              शंभूचे देखील खेळताना मित्रांसोबत भांडणं होत असतात त्यावेळी आम्हाला सांगायला येत असतो परंतु त्यालाही आम्ही सांगत असतो की,  "तुझं तू पाहून घे बाबा". मुलांची बाजू घेऊन त्याचा निर्णय आपण घेतला की मुलं आणखी बिनधास्त होतात . पुन्हापुन्हा लहान गोष्टीसाठी आपल्याकडे येतात.
शंभू मोठा होऊ लागलाय.  आमचा नेहमीच कयास असतो की मुलाला आयतं मिळायला नकोय. मग ते निर्णय असो किंवा इतर बाबी. त्याचे अगदीच महत्त्वाचे आणि टोकाचे निर्णय असतात त्यावेळी लक्ष द्यावेच लागणार आहे पण त्यातही पूर्ण हस्तक्षेप न करता त्यालाच निर्णय घेण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न असतो.
           मुलांच्या किंवा आपल्या लहान कामात आयते निर्णयाचे कोलीत मिळतं राहिले तर मोठे निर्णय घेताना अडचणीत वाढ होते. ऎनवेळी मोठी बाब घडली किंवा करायची असेल त्यावेळी काय करावे ते सूचत नाही. माणसाला निर्णयक्षमतेचा विकास करण्यासाठी स्वतःची बुद्धी वापरून विचारशैली विकसित करावी लागते , निर्णय घेऊन त्यांचे पालन करावे लागते हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे ,असे मला वाटते.
धन्यवाद .

Comments

Popular posts from this blog

लेकरांना मित्रपरिवार वाढवू द्या

*लेकरांना मित्रपरिवार वाढवू द्या* लहान मुलांना खेळणी खेळायला खुप आवडते. शंभूराजला बाजारातून आणलेल्या गाड्यांच्या खेळण्यांची विशेष आवड आहे . आमच्या घरात ढीगभर गाड्या पडलेल्या असतात. तरीही इतर वस्तूंना गाडी समजून खेळण्याची भारी आवड आहे. आमच्या घरात शेजार मित्रमंडळींच्या लेकरांची आणि इतरही आजूबाजूच्या घरातील लेकरांची नेहमीच ये जा असते. शंभुराजच्या खेळण्यांचा सर्वजण आनंद घेत असतात त्यामुळे लेकरं लेकरांच्या जवळ आपसूक येतात. एकमेकांच्या खेळण्यांना शेअर करत असतील तर त्यांच्यातील सामाजिकतेचा बंध उत्तम गतीने विकसित होत आहे असे म्हणता येईल. लहानपणी अनेक बदलातून मूल घडत असते. त्यापैकी एक आपली वस्तू कोणासही न देणे.  अशी मुलं आपल्या वस्तूला कोणासही हात लावू देत नाहीत .  त्याच्या वस्तूला हात लावलेलं अजिबात आवडत नाही.एका दृष्टीने ते बरोबर पण असेल पण अनेकदा मुलांमध्ये ही सवय दिसते की आपल्या वस्तू कोणालाही द्यायला तयार होत नाही. हे खास ज्यावेळी आपली वस्तू नवीन असते त्यावेळी मुले आपली वस्तू द्यायला तयार होत नाहीत. खरंतर लहान मुलांना ही सवय असायला हवी की आपल्याकडे असलेली गोष्ट सहजतेने इतरांन...

मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत

* मुलांच्या कल्पनेच्या दुनियेत ....* 📝 *ज्ञानदेव नवसरे, नाशिक* फोटो सौजन्य : Google              आज पहिलीच्या मुलांना मुक्त चित्र काढण्यासाठी कोरे कागद दिले होते. मी फळ्यावर फुले,बादली, ग्लास, फुलपाखरू यांचे सोप्या पद्धतीने काढलेली चित्रे फळ्यावर रेखाटली होती.      सचिन ने काढलेले चित्र मला दाखवले. मी म्हणालो,"हे काय आहे ?" सचिन, "हे भूताचे , हे माझे आणि हे माझ्या घराचे चित्र आहे". मी म्हटले, छान काढलेय. मुलांनी सचिनचे चित्र पाहायला लगबग केली. सचिनच्या जवळ मुलांचा गलका जमा झाला. त्यांच्यात भुतांच्या गोष्टी वर गप्पा सुरू झाल्या. भूत अमुक असतं ,तमुक असतं आणि ब-याच गोष्टी चालू होत्या.माझ्या इयत्ता चौथीचा इंग्रजी विषय असल्याने मी पेपर तपासत असताना मुलांमधील सुरु असणा-या गप्पांकडे लक्ष जात होतेच.थोडा वेळ थांबून ऎकून घेतले. गावात म्हसोबाचे मंदीर आहे त्या देवस्थानाला जागृत देवस्थान म्हटले जातेय. भूत म्हणले की देव आलाच त्यामुळे म्हसोबावर बोलत होते. म्हसोबावर कडे हातात घातले की भूत काय बी करत नाय. माझी आई म्हसोबाला  दिवा लावते ...

मुलांना दिशा देऊयात

* मुलांना दिशा देऊयात *   अाज नेहमीप्रमाणे शंभू खिदळून आला होता पण त्याच्या चेह-यावरील तेज कमालीचे होते. "आप्पा चला ना खेळायला जावू" शंभू लाडात येऊन बोलला. मी शाळेतून दमून आलो होतो.  "नको रे शंभू ,मी खुप दमलोय. " आई सांग ना आप्पाला ." खरतर आमचं दोघांचं खेळणं म्हणजे भारीच असतयं.  शंभूच्या खेळण्यांसोबत रमताना मलाही लहानपणाचा अनुभव घेता येत असतो.कधीकधी माझी बायको मला खुप हसते माझे बाळासोबत असतानाचे संवाद, चेह-यावरील हावभाव पाहून.😁 माझं लहान झालेलं पाहून शंंभू मात्र बिनधास्तपणे माझ्यासोबत खेळतो. ब्लाॅक्स ची भरणी आम्ही खाली घेतली .दोघंही वेगवेगळे आकार बनवायला लागलो. मी गाडीचा आकार बनविला अन शंभूचे काम सुरूच होते. "काय बनवितोय शंभू?" मी म्हणालो.  "मला घर बनवायचेय."  मी घराच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले अन त्यानेही सगळी उत्तरे दिली. "मला लय काही बी बनविता येते." शंभू बोलत होता.  काय काय बनविता येते? बंदूक, गाडी,घर,शाळा ,पाटी ,माणूस.  मी त्याचे कौतुक केले अन त्याला कवेत घेतले .यावरून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मुलांकडे गु...