Skip to main content

लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा ..

*लेकरांच्या कमी वयात पालकांच्या अपेक्षा..*
www.Shikshanvichar.blogspot.in

             अलीकडे  पाल्यांच्या विकासासाठी पालक मेहनत घेताना दिसत आहेत . पालकत्व म्हणून त्यांचे खुप कौतुकच करावे लागेल पण यामध्ये मुलांची गुणवत्ता, आवड निवड, त्याचे वय, क्षमता लक्षात घेऊन प्रयत्न करायला हवेत असे मला वाटते.
जिथे मुलगा दोन वर्ष पूर्ण करतोय , नीट बोलायला लागत नाही तिथे आई बाप लेकराला नर्सरी वगैरे वर्गात कोंबतात. मुलांना अभ्यास करायचा ससेमिरा पाठीमागे लागण्याचे वातावरण घरोघरी तयार होताना दिसत आहे आणि ते भयानक आहे . नर्सरी, प्ले ग्रुप वगैरे या वर्गात टाकायला हरकत नाही पण तिथे त्याच गोष्टी व्हाव्यात ज्या घडायला हव्यात.  गाणी, खेळ या गोष्टींसाठी त्यांचा फायदाही होतोच. पण यासोबतच कमी वयाच्या याच लेकरांकडून पालकांच्या अपेक्षा वाढायला सुरु होतात . मुलाने लिहिले पाहिजे, वाचले पाहिजे असे त्यांना वाटते. त्यासाठी अभ्यास घ्यायला सुरुवात होते. मुलांनी अभ्यास करावा असे पालकांना वाटू लागते.

मुलांचा अभ्यास म्हणजे काय हो? 
महागडी पुस्तके, वह्या , वर्कबुक ,सीडी, घेऊन त्या नाजून वयातील मुलांना तासन् तास एका जागी बसवून त्याच्या मनाची कोंडमारी करण्याचे काम काही पालक अलीकडच्या काळात करताना दिसत आहेत. अमुक्याच्या लेकराला अमुक येतेय म्हणून माझ्या लेकराला पण ते आले पाहिजे अशी भावना मोठ्या प्रमाणात पालकांमध्ये वाढताना दिसतेय. खरंतर प्रत्येक मुलाच्या आवडी निवडी, क्षमता, अनुभव अन त्याला मिळणारे  वातावरणात फरक असतो त्यामुळे अगदीच कमी वयात मुलांवर अभ्यासासाठी टाकला जाणारा दबाव मुलांच्या भविष्यासाठी पोषक ठरण्याऎवजी मारक ठरतोय यात शंका नाही. कमी वयात अभ्यासासाठी मुलांवर दबाव टाकणे ,त्याला एका जागी तासनतास् बसवणे, खेळू न देणे यातून नुकतीच बहरायला लागलेली लेकरं सुकून जाताना दिसतात.लहान वयात मुलांना त्यांच्या पद्धतीने खेळू दिले, शिकू दिले की ती शिकतात .त्यातून क्षमता विकसित होत असतात. पण पालकांची घाई शिकवण्याच्या ठरावीक पद्धतीने मुलांच्या कल्पनेशक्तीला घातक ठरताना दिसत आहे. दोन -तीन वर्षाच्या लेकराचा अभ्यास म्हणजे केवळ वही अन पुस्तकच आहे का? मुलांना गोष्ट सांगून त्यावर प्रश्न विचारून त्यांना बोलते करणे हा पण अभ्यास ना ! काही साहित्य उपलब्ध करुन त्यावर मुलांच्या बोलण्याचे निरिक्षण करुन त्यानुषंगाने गप्पा करुन मुलांच्या कल्पनाशक्ती वाव देणे ही महत्त्वाचे आहे पण लेकराला लिहिताच ,वाचताच आले पाहिजे असा हट्ट पालक नर्सरी च्या शिक्षकांकडे करताना दिसतात . का?

मुलांचा अभ्यास कसा घ्यावाऎवजी मुलांची बुद्धिमत्ता कशी विकसित करता येईल याचा विचार मुलांच्या  सुरुवातीच्या वयात पालकांनी करायला हवा.
मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास करायचा म्हणजे, आपल्या मुलाने त्याच्या मेंदूच्या क्षमतेचा वापर करायला हवा. प्रत्येकाकडे प्रखर बुद्धिमत्ता असते .फक्त त्याचा वापर कसा करायचा, हे मुलांना न कळल्यामुळे अनेकदा ही मुलं गोंधळतात. हा गोंधळ त्यांच्या शरीराच्या देहबोलीवरुन नक्की दिसतो. मुलामध्ये हा गोंधळ कसा निर्माण झाला . त्याला स्वातंत्र्य देण्याऎवजी लादलेल्या बंधनातून मुलांच्या मनात गोंधळ घडतो. मुलांच्या बुद्धिमत्ता विकसनासाठी वातावरण निर्मिती करणे, अनुभव देणे, मुलांचे निरिक्षण करुन, शंका दूर करुन, माहिती देऊन मुलांना बोलते  करणे सुद्धा गरजेचे आहे असे मला वाटते.
पालकांनी मुलांचा इतरांसोबत चा संवाद, खेळ यांचे निरिक्षण करायला हवे मोकळीक देता. ज्या वेळेस मुलांना मोकळीक दिली जाते, त्यांच्यासमोर कार्य ठेवली जातात तेव्हा  आपोआपच मुलांची विश्लेषक शैली विकसित होते.ज्यावेळेस मुलांना सारखे प्रश्न विचारले जाता, काही साहित्य देऊन नवीन निर्मिती करायला दिली जाते तेव्हा त्यांच्यामध्ये कल्पनाशक्ती, सृजनशीलता यायला लागते.
मुलांची कल्पनाशक्ती ,सृजनशीलता, विश्लेषक शैली सुरूवातीच्या काळात झपाट्याने वाढत असते तिला योग्य गती देण्यासाठी योग्य वातावरण, संवाद,खेळ ,साहित्य यांची गरज पालकांनी ओळखायला हवी असे मला वाटते.
धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थी विकास

#विद्यार्थी विकास आमच्या पहिलीच्या वर्गातील कृष्णा नावाचा मुलगा शब्द चित्रांचा खेळ खेळताना नेहमीच त्याच्या भावविश्वात रमत असतो. एखाद्या वस्तूचे चित्र दाखविले तर त्यांचे त्या चित्रासंबंधी घरचे आणि त्याला अनुभवाला आलेले विचार सुरु असतात. आणि तो तसं सांगूनही टाकतो. एकदा फळ्यावर आम्ही साप हा शब्द तयार करुन वाचला कृष्णाने त्याच्या घरी निघालेल्या सापाचा सर्व अनुभव सांगितला. मी त्याला कुठेही अडवले नाही. उलट आणखी प्रश्न विचारून त्याला बोलते केले. त्याचे ज्ञान पाहून मला आश्चर्य वाटले. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये खुप ज्ञान असतं पण ते  त्यांना ते मांडता आलं नाही तर त्यामुळे निराशा यायला लागते. बरेचदा असं होतं. ज्यांना ज्ञानासोबत मांडण्याची कला असते ती मुलं जास्त आत्मविश्वासी दिसतात. कृष्णा खुप आत्मविश्वासाने बोलत होता. अनेकदा मुले वेगळ्या पद्धतीने विचार मांडत असतात. एखाद्या विषयाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करताना दिसतात.अशा मुलांना कधीही थांबवू नये. नवीन विचार करणं, नवीन दिशा मिळणं हा खरतर चांगला गुण आहे. घरीही मुलं बोलत असतात.पण बरेचदा पालक -शिक्षकच मुलांना थांबवत असतात. मुलांसोबत मनाने रा

माझा पाडा ,माझे विद्यार्थी

 *माझा पाडा, माझे लोक, माझे विद्यार्थी*     - ज्ञानदेव नवसरे        पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील सेवा हा आयुष्यभर न विसरता येणारा ठेवा आहे .पेठच्या पश्चिमेस १० किमी अंतरावर गुजरात सरहद्दीवर असणारे डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले टुमदार असा कळमपाडा माझ्या सुरूवातीच्या सात वर्षांच्या नोकरीचा न विसरता येणारा महत्त्वाचा टप्पा होता.            कोराना कालावधीमुळे लांबणीवर पडलेली आमची कळमपाडा शाळेचे भेट आज धामणगाव शाळेच्या टीमसोबत  झाली.           कळमपाडा हे निसर्गाने जितके नटलेलं आहे त्यापेक्षा जास्त या पाड्यामध्ये राहणाऱ्या माझ्यासारख्या पर-जिल्ह्यातून आलेल्या लेकरावरं स्वतःच्या लेकराइतकं, भावाइतकं प्रेम करणाऱ्या माझ्या ह्रदयस्पर्शी लोकांचं हे गाव आहे. माझ्याबद्दल कळमपाड्यातील लोकं काय बोलतात हे कळमपाड्यातील लोकं , माझे विद्यार्थी बोलतील ,याबद्दल मी काय बोलणार ?               काम करणा-या शिक्षकांच्या कामाचा सन्मान कसा करावा हे आमच्या कळमपाड्यातील लोकांकडून शिकावं .        ब-याच दिवसानंतर आमचा गुरुजी दिसल्यावर डोळ्यात पाणी आणून माझे पाय पकडू पाहणाऱ्या आमच्या भोये आजी , म

शिक्षण प्रेरणादूत

 #प्रेरणादूत :- आशाबाई विजय जेजूरकर             - जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव                 सालाबादप्रमाणे या वर्षीही जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव येथे राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला आयोजित मी ज्ञानी होणार हा सामान्यज्ञानावर आधारित उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. या उपक्रमामध्ये आमच्या शाळेतील एक शिक्षक दररोज फळ्यावर संस्थेमार्फत दिले जाणारे पाच प्रश्न लिहित असतो , शाळेच्या आवारात हा फळा मुलांना प्रश्न वहीत उतरून काढण्यासाठी ठेवला जात असतो.मुले वहीत लिहितात, दरमहिन्याला एक सराव चाचणी  परिक्षा घेतली हा नित्यक्रमे वर्षभर चालणारा आमचा कार्यक्रम.           शाळेतील ही प्रकिया घडत असताना याचा परिणाम शाळेतील आजूबाजूच्या घटकांवरही कसा होतो याचे हे उदाहरण आहे. आमच्या शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी असणाऱ्या शा.पो.आ चे काम पाहणाऱ्या आशाबाई विजय जेजूरकर  . सर्व विद्यार्थी , आम्ही शिक्षक त्यांना मामी म्हणतो. त्या  शाळेच्या आवारात ठेवलेल्या फळ्याचे वाचन नियमित करत असतात. दररोज लिहिलेले प्रश्न जाणून घेण्याची  मामींना जणू जिज्ञासाच  असते . आमच्यासोबत अधूनमधून विविध प्रश्नांची चर्चा करत अ